रेल्वेच्या ६४ हजार जागादाठी तब्बल १ कोटी ८७ लाख अर्ज

देशात बेरोजगारीचे भीषण वास्तव, रेल्वे मंत्रालयानेच दिली आकडेवारी, उपाय काय?

दिल्ली – सरकारी नोकरी मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. प्रत्येकाचे ते स्वप्न पूर्ण होईल, याची काहीच खात्री नसते. त्याचबरोबर देशात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. याचेच वास्तव दाखवणारी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

रेल्वे मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीतून धक्कादायक भीषण वास्तव समोर आले आहे. कारण रेल्वेने २०२४ साली ६४१९७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आणि देशभरातून १.८७ कोटी लोकांनी या पदांसाठी अर्ज केले. म्हणजेच एका पदासाठी तब्बल २९१ उमेदवारांमध्ये स्पर्धा होती. आरपीएफ कॉन्स्टेबलच्या ४२०८ पदांसाठी सुमारे ४५.३ लाख अर्ज प्राप्त झाले. याचा अर्थ असा की प्रत्येक पदासाठी सुमारे १०७६ उमेदवार रांगेत होते. तंत्रज्ञांच्या १४२९८ पदांसाठी सुमारे २६.९९ लाख लोकांनी फॉर्म भरला, तर असिस्टंट लोको पायलट म्हणजेच एएलपीच्या १८७९९ पदांसाठी १८.४ लाख उमेदवारांनी अर्ज केले. एनटीपीसी श्रेणीतील लोकप्रिय पदांसाठीही प्रत्येक पदासाठी ७०० हून अधिक उमेदवार होते. महत्वाचे म्हणजे रेल्वे मंत्रालयाच्या मते, सध्या ९२११६ पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. यापैकी ५५१९७ पदांसाठी संगणक आधारित चाचणी (सीबीटी) घेण्यात आली आहे. या परीक्षा देशातील १५० हून अधिक शहरांमध्ये आणि १५ भाषांमध्ये घेण्यात आल्या. एएलपी, आरपीएफ एसआय, कॉन्स्टेबल, कनिष्ठ अभियंता आणि सीएमए सारख्या अनेक पदांचे निकालही जाहीर झाले आहेत.

गेल्या २० वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, २००४ ते २०१४ दरम्यान, रेल्वेने ४.११ लाख कर्मचाऱ्यांची भरती केली, तर २०१४ ते २०२५ दरम्यान ही संख्या ५.०८ लाखांपर्यंत वाढली. म्हणजेच सुमारे एक लाख अधिक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पण बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.