नशा करण्यासाठी वापरले जाणाऱ्या इन्जेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍यास अटक ; २५ हजार रुपयांचा माल जप्त

रक्तदाब कमी झाल्यावर घेतले जाणार्‍या मॅफेनटरमाईन सल्फेट या इन्जेक्शनचा नशा करण्यासाठी वापर करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या इन्जेक्शनचा साठा करुन त्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍यास हडपसर पोलिसांनी पकडले आहे.ओंकार अंगद बिनवडे (वय २१) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे मॅफेनटरमाईन सल्फेट हे इन्जेक्शनच्या ३९ बाटल्या आढळून आल्या आहेत.

ओंकार बिनवडे हा हे इन्जेक्शन ६०० ते ७०० रुपयांना विक्री करत होता. बाजारभावानुसार त्यांच्याकडे २५ हजार रुपयांचा माल आढळून आला.हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार दीपक कांबळे, निलेश किरवे, अभिजित राऊत यांनी कारवाई करुन ओंकार बिनवडे याला पकडले. आरोपी ओंकर बिनवडे याच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना तसेच त्याने औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणार्‍या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते, हे माहिती असताना सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या विक्रीकरीता ते बाळगले असल्याचे दिसून आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, दीपक कांबळे, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजित राऊत यांच्या पथकाने केली आहे.