प्रेयसीसोबत वाद ! प्रियकराने प्रेयसीचा उशीने तोंड दाबून पोटात हत्यार भोसकून केला खून; प्रियकरावर गुन्हा दाखल

दोघांमध्ये झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीच्या रुममध्ये शिरुन उशीने तिचे तोंड दाबून पोटात हत्यार खुपसून तिचा खून केल्या प्रकार उघडकीस आला आहे.ज्योती नवनाथ केसरकर (वय २९) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या बाबत तिच्याबरोबर राहणार्‍या ३० वर्षाच्या महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ज्योती हिचा प्रियकर साहिल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाल्हेकर वाडीत बुधवारी दुपारी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, ज्योती केसरकर व त्यांची एक मैत्रिण अशा एकत्र रहात असून हॉटेलमध्ये कामगार आहेत. फिर्यादी आणि ज्योती निपाणी तालुक्यातील मत्तीवडे गावच्या राहणार्‍या आहेत. दोघांचे पती दारु पिऊन मारहाण करीत असल्याने त्या गावातून निघून पुण्यात कामाला आल्या होत्या. ज्योती हिचा त्यांच्या गावाच्या शेजारील यमगरनी येथील साहिल नावाचा प्रियकर असून तो अधून मधून तिला पुण्यात भेटायला येत असत. साहिल हा पुणे येथे येऊन ज्योती सोबत कोणत्यातरी कारणावरुन वाद केल्याने ते दोघे मागील दीड महिन्यांपासून बोलत नव्हते. ज्योती साहिल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत होती.

बुधवारी सकाळी फिर्यादी या आवरुन रुममधून हॉटेलला गेल्या. ज्योती ही उशिरा हॉटेलमध्ये येणार होती. दुपारी ३ वाजता त्यांची मैत्रिण रुममध्ये गेली असता ज्योती ही गादीवर बेशुद्ध पडलेली होती. तिच्या चेहर्‍यावर एक उशी होती. अंगावर चादर ओढलेली दिसत होती. चादर काढल्यावर तिच्या पोटातून रक्त येत असल्याचे दिसले. मॅनेजरने सीसीटीव्ही पाहिले असता १० वाजून ३५ मिनिटांनी साहिल हा आल्याचे व दहा मिनिटांनी निघून गेल्याचे दिसून आले. त्यावरुन खात्री झाली की साहिल याने ज्योतीच्या तोंडावर उशीने तोंड दाबून पोटात हत्यार भोसकून तिचा खून केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळू तपास करीत आहेत.