मुंबईत भयानक प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरकोळ कारणावरुन जमावाने युवकाची हत्या केली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे.
मुंबईत किरकोळ वादातून जमावाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. गाडी ओव्हरटेक करण्यावरून त्याचा वाद झाला होता. आकाश माइन (वय २८) असे त्या मृत युवकाचे नाव आहे. मालाडच्या दिंडोशी भागात ही घटना घडली. आकाश माइन हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश कदम या ऑटोचालक आणि आकाश माईन यांच्यात वाद झाला. आकाश हा दुचाकीवर होता. तर अविनाश कदम हा रिक्षाचालक आहे. ओव्हरटेकवरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी इतर रिक्षाचालकही आकाशला मारहाण करण्यासाठी पोहचले. त्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडिओमध्ये आकाश जमिनीवर पडलेला दिसत आहे. तसेच जमाव त्याला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. फुटेजमध्ये आकाशची आई दीपाली त्याच्यावर झोपून आणि त्याला संरक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच आकाशचे वडील हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु त्यांच्यावरही आरोपींनी हल्ला केला आहे. आकाश हा मालाड पूर्व येथे राहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना दसऱ्याच्या निमित्ताने भेटण्यासाठी गेला होता. टनेच्या वेळी आकाश पत्नीसोबत दुचाकीवर होता, तर त्याचे आई-वडील दुसऱ्या ऑटो रिक्षात होते. पोलिसांनी या प्रकरणी ९ आरोपींना अटक केली आहे.