हॉटेलमध्ये बिलावरुन वाद ,नंतर हाणामारी आणि…. हॉटेल चालक जखमी, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील एका व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हॉटेलमध्ये बिल देण्यावरून ग्राहक आणि हॉटेल चालकात तुफान मारहाण झाली आहे.  ही घटना २३ जुलै रोजी रात्री घडली. बिलावरुन वाद आणि त्यानंतर हाणामारी असा हा प्रकार होता. या प्रकरणात सागर ओहोळ याच्यासह तथागत मस्के, निखिल ननवरे, समर्थ वस्ताद यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

बार्शी शहरातील एका हॉटेलमध्ये बिल देण्यावरून हॉटेल चालकाशी चौघ जणांनी वाद घातला. त्यानंतर त्या हॉटेल चालकास तुफान मारहाण चौघांनी केली. या मारहाणीनंतर चौघांविरोधात बार्शी पोलिसात विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ (१), ११५ (२), ३२४ (४), ३०८ (३), ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. हॉटेल चालू ठेवायचा असल्यास वीस हजार रुपये खंडणीचीही मागणी केल्याचा आरोप करण्यात आला.

 

बार्शीमधील बिअरबार असलेले हे हॉटेल दिसत आहे. या हॉटेलमध्ये मद्य प्राशन केलेल्या ग्राहकाने बिलासंदर्भात वाद घातला. त्या वादातून हॉटेलच्या मॅनेजरवर बाटली फोडली. हॉटेल मॅनेजर बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु इतर दोघा, तिघांनी त्याला जबर मारहाण सुरु केली. मॅनेजरला दारुच्या बाटल्या फेकून मारत लाथाबुक्यांनी तुडवले. यावेळी हॉटेलमध्ये असणारे काही ग्राहक त्यांना सोडवताना दिसत आहे. या मारहाणीत हॉटेल चालक जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.