डंपर बाजूला घे सांगितल्यावरून वाद ! डंपर चालकाची एस टी बसचालक व वाहकाला मारहाण

पुणे – बस थांब्यावर एस टी बसच्या समोर उभा केलेला डंपर बाजूला घे, असे सांगितल्याच्या कारणावरुन डंपर चालकाने एस टी बसचालक व वाहकाला मारहाण केली.

याबाबत बसचालक कुंडलिक ज्ञानदेव गाडीलकर (रा. टाकळी हाजी, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल सोनवणे (रा. जांबुत, ता. शिरुर) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जांबुत गावातील पंचतळे येथील चौकात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबुत गावातील पंचतळे येथील चौकात एस टी बस थांब्यावर बस थांबली होती. त्यावेळी राहुल सोनवणे याने त्याचा डंपर बसच्या समोर उभा केला. फिर्यादी यांनी त्याला डंपर बाजूला घे, असे म्हणाले. त्यावर त्याने फिर्यादी व वाहक शांताराम मारुती रासकर यांना शिवीगाळ करुन दमदाटी करीत हाताने मारहाण केली. त्यांना ढकलून देऊन शासकीय कामात अडथळा आणला. पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे  तपास करीत आहेत.