
दारु पिण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मित्राने दोघांच्या मदतीने सुरक्षारक्षकाचे अपहरण करुन खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी मित्रासह दोघा चालकांना अटक केली आहे.

याबाबत किशोर कांचन कोईरी (वय ३३) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ रामकुमार शामचरण कोईरी (वय २८) यांचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी शिवा तंतुबाइ (वय २५) व दोन वॅगनर चालकांना अटक केली आहे. ही घटना बाणेर येथील कुंदन वेस्टोर्स येथे २२ सप्टेंबर रोजी पावणे बारा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकुमार कोईरी हे बाणेरमधील कुंदन वेस्टोर्स येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या ओळखीचा शिवा तंबुबाइ याच्याबरोबर मागील १५ दिवसांपूर्वी दारु पिण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन शिवा याने दोघा वॅगनर चालकांच्या मदतीने रामकुमार यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले. त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. २० हजार रुपयांची खंडणी मागितली. चतु:श्रृंगी पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यांचे लोकेशन शोधून तिघांना पकडून रामकुमार कोईरी यांची सुटका केली़ सहायक पोलीस निरीक्षक झरेकर तपास करीत आहेत.









