दोन तरुणांमध्ये शेळी बांधण्यावरून वाद; भिंतीवर डोकं आपटून २१ वर्षीय तरुणाचा केला खून, दोघांना घेतले ताब्यात

घराच्या भिंतीवर डोके आपटून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री ८:४५ वाजताच्या सुमारास येथील दाभडी रोडवरील संभाजीनगरात घडली. बादल केशव टाले (२१) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बादल टाले व घराजवळच राहणाऱ्या दोन तरुणांमध्ये शेळी बांधण्यावरून दुपारी वाद झाला होता. रात्री संभाजीनगरातील गणेश मंडळाजवळ अन्नदानाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्यातील वाद उफाळून आला. बादल याला दोघांनी घराजवळ असलेल्या बोळीत नेले. त्या ठिकाणी त्याचे एकाने भिंतीवर वारंवार डोके आपटले तर, दुसऱ्याने मारहाण केली.

या प्रकारात गंभीर होऊन बादल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच आर्णी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आकाश दोडफोडे व कन्हैया वाघमारे (रा. संभाजीनगर, आर्णी) या तरुणांना ताब्यात घेतले. उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.