पुण्यातील कल्याणीनगर येथील ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणाचे पडसाद अद्याप उमटत आहे. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा असाच एक अपघात घडला आहे. शहरात आणखी एक भयंकर अपघात झाल्याची घटना समोर आली असून, त्याचा एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने आलेल्या एसयूव्हीने टेम्पो ट्रकला धडक दिली, ज्यामध्ये ड्रायव्हर आणि क्लीनर असे दोघे जण जखमी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील एका नेत्याचा मुलगा ही कार चालवत होता. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. शरद पवार यांच्या पक्षातील नेते, बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ ही कार चालवत होता, आणि अपघातावेळी तो दारूच्या नशेत होता.
या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुनसान रस्त्यावरून एक ट्रक जात असताना समोरून भरधाव वेगाने एक कार आली. टेम्पो चालकाने गाडी वळवण्याचाही, बाजूला घेण्याचाही प्रयत्न केला, पण तेवढ्यात कारने पुढच्या बाजूने जोरदार धडक दिली.
हा अपघाता एवढा भीषण होता की टेम्पो आणि ती कार दोघांच्याही पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर दोघेही बरेच जखमी झाले. दोन्ही वाहनांच्या धडकेमुळे कोंबड्या टेम्पोतून रस्त्यावर पडल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतंय. या अपघाताप्रकरणी आरोपी सौरभ गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.