दोन तुल्यबळ उमेदवारांना देणार टक्कर, राज्यातील खासदारांची कोंडी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
दिल्ली – भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाप्रणित रालोआ आणि काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीत यावेळी सामना होणार आहे. पण आता आणखी एका उमेदवाराने अर्ज दाखल केल्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा उमेश म्हेत्रे या तरुणाने थेट उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिल्लीतील राज्यसभा सचिवालयात निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. मोदी आणि गरिमा जैन यांच्याकडे त्याने आपला अर्ज सादर केला. यासाठी आवश्यक असलेले १५,००० रुपयांचे डिपॉझिट त्याने जमा केले आहे. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची तर विरोधी पक्ष असलेल्या इंडिया आघाडीने बी सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली आहे. मात्र आता त्यांना म्हेत्रे यांचे आव्हान असणार आहे. उमेश म्हेत्रे हे महाराष्ट्र लोक काँग्रेस या पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. “मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. राजकीय पक्ष नेहमी श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींना उमेदवारी देतात. पण संविधानाने मला आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला हा अधिकार दिला आहे,” असे उमेश यांनी सांगितले. त्यांनी गेल्या महिनाभरात सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करून हा अर्ज दाखल केला.म्हेत्रे हे महाराष्ट्रातील असल्यामुळे राज्यातील खासदारांची कोंडी झाली आहे. आता निवडणूक आयोग या अर्जाची छाननी करणार असून, तो वैध ठरल्यास उमेश म्हेत्रे प्रत्यक्ष मतदानाच्या शर्यतीत सहभागी होतील. ही निवडणूक ९ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
उमेश यांनी यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीतही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्या निवडणुकीत अर्ज वैध ठरण्यासाठी अनुमोदक म्हणून किमान दहा आमदारांच्या सह्या आवश्यक होत्या. आवश्यक सह्या पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला होता.