पिंपरी – घराच्या दरवाजावर थाप मारुन गोंधळ घालणार्यांना जाब विचारल्याने तरुणावर चाकूने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. उमेशकुमार दिपपरमेश्वर राम यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी यामराज देवीसिंह कटूवालरा, रमेश खटकाबाहदूर खत्रिरा आणि इंद्र धनसूर थापा यांना अटक केली आहे. हा प्रकार हरगुडे वस्तीकडून पवार वस्तीकडे जाणार्या रोडच्या कडेला सोमवारी रात्री साडेनऊ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या रुममधील सहकारी सोबत रुमचा दरवाजा बंद करुन जेवण करत होते. त्यावेळी कोणीतरी त्यांचा बंद दरवाजा बाहेरुन जोरजोरात थाप मारत होते.
फिर्यादी यांनी दरवाजा उघडून रुमच्या बाहेर पाहिले असता त्यांच्या रुमच्या जवळ असलेल्या किराणा दुकानासमोर आरोपी उभे असलेले दिसले. फिर्यादी यांनी आमच्या दरवाजावर थाप का मारली व तुम्ही येथे गोंधळ का घालता, असे विचारले. त्याचा राग येऊन चिडून जाऊन त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. रमेश व इंद्र यांनी फिर्यादीस हाताने मारहाण केली. यामराज याने फिर्यादी यांना तेरे को ज्यादा मस्ती आई क्या, अभी तेरे को काट डालता है, असे म्हणून हातातील चाकूने फिर्यादी यांचे मानेवर, डाव्या बाजूला मारुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक खारगे तपास करीत आहेत.