पुण्यात पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न ;बुधवार पेठेतील घटना

बुधवार पेठेत एका युवकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी दि.२३ रात्री पावणे दहाच्या सुमारास बुधवार पेठेतील सार्वजनिक रोडवर घडला आहे.

याबाबत प्रसाद अरुण भोसले यांनी सोमवारी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार विजय केशवराव घुमारे याच्यावर आयपीसी ३०७, ५०४, महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय घुमारे आणि फिर्य़ादी प्रसाद भोसले यांच्यात एक महिन्यापूर्वी थुंकल्याच्या कारणावरुन वाद झाला होता. याचा राग आरोपीने मनात धरून होता. रविवारी रात्री फिर्य़ादी व त्यांचे इतर चार मित्र बुधवार पेठेतील श्री सरस्वती हाईट्स समोरील सार्वजनिक रोडवर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी फिर्यादी यांना खोकला आला. याचा राग धरुन व एक महिन्यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरुन आरोपी विजय घुमरे याने कंबरला असलेले पिस्टलसारखे हत्या बाहेर काढले.

पिस्टल लोड करुन प्रसाद भोसले यांच्या पोटाला लावून शिवीगाळ केली. तसेच पिस्टलमधील सर्व राऊंड तुझ्या पोटात फायर करेन. तुला आता जिवंत ठेवत नाही, तुला खल्लास करुन टाकतो, मला किरकोळ समजतो का? असे म्हणून आरोपीने पिस्टलचे टिगर दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पिस्टल मधून गोळी सुटली नसल्याने फिर्य़ादी थोडक्यात बचावले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.