फोन उचलला नाही तसेच पेट्रोल टाकण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; कोंढव्यातील घटना

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फोन उचलला नाही, तसेच गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरुन धारदार शस्त्राने मारहाण करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी २२ सप्टेंबर रोजी कडनगर चौकातील एस टायर पंक्चरच्या दुकानासमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या प्रकरणी योगेश रामदास लोंढे (वय-२८) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरबाज अरिफ सय्यद (वय-२८) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एस टायर पंक्चरच्या दुकानामध्ये त्यांच्या गाडीची पंक्चर काढून घेत होते. अरबाज याने फिर्यादी योगेश यांच्याकडे पेट्रोलसाठी पैसे मागितले होते. पैसे देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला. अरबाज याने २१ तारखेला फिर्यादी यांना फोन केला होता. तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे अरबाज सय्यद याच्या मनात त्याच्याविषयी राग होता. फिर्यादी हे पंक्चर काढून घेत असताना अरबाज पंक्चरच्या दुकानात आला.

दरम्यान, अरबाजने मनात राग ठेऊन त्याने फिर्यादीच्या डोक्यात, तसेच उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. फिर्यादी हे जखमी झाल्यानंतर अरबाज हा घटनास्थळावरून पळून गेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत