
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाला असा विजय, इंग्लडचे नुकसान तर भारताला फायदा

मुंबई – शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाचवा कसोटी सामना सहा धावांनी जिंकत मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. ही मालिका २०२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धातील पहिलीच मालिका होती.

ओव्हल कसोटीतील विजयाचा फायदा भारताला थेट WTC गुणतालिकेत झाला आहे. या सामन्यापूर्वी भारत चौथ्या स्थानावर होता, पण या विजयामुळे भारताने एक स्थान वर येत तिसरे स्थान पटकावले आहे. तर इंग्लंडची टीम चौथ्या स्थानावर घसरली आहे. गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश संघ सध्या पॉइंट टेबलमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज संघ शेवटच्या म्हणजेच सहाव्या क्रमांकावर आहे. दरम्यान सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चक्रात न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी अद्याप एकही सामना खेळलेला नाही. दरम्यान भारताने विदेश दौऱ्यावर असताना पाच कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने यापूर्वी १६ वेळा विदेशात कसोटी मालिका खेळल्या. पण प्रत्येक वेळी शेवटच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण यावेळी तसं काही झालं नाही. तसेच कसोटीत इतक्या कमी फरकाने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००४ मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये १३ धावांनी विजय मिळवला होता. १९७२ मध्ये इंग्लंडविरुद्ध कोलकात्यात २८ धावांनी, तर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडलेटमध्ये ३१ धावांनी विजय मिळवला होता.
पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ३५ धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे ४ गडी शिल्लक होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना कोणतीही संधी न देता सामना जिंकला. तब्बल ७७ वर्षानंतर विजयाचा दुष्काळ संपवला आहे.









