
नियम न पाळणाऱ्या शाळांवर शिक्षणमंत्र्यांचा कारवाईचा इशारा, प्रत्येक विद्यार्थ्याला हेल्थकार्ड, शिष्यवृत्तीबाबतही निर्णय

मुंबई – मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आलं आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असणार आहे.

जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आला आहे. उच्च दर्जाच्या शिक्षणासोबतच आता विद्यार्थ्यांच्याही आरोग्याची काळजी शालेय शिक्षण विभाग घेणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांची जी काही तपासणी व्हायची ती औपचारिकरित्या व्हायची. मात्र, आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य पथक विद्यार्थ्यांची तपासणी करणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना एक हेल्थ कार्ड देणार आहे. हे हेल्थ कार्ड त्यांना आयुष्यात अनेक ठिकाणी उपयुक्त पडणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये कोण कोण आहे. याची लवकरच माहिती समोर येणार आहे. यात कोणावरही अन्याय होणार नाही. शिक्षण विभाग म्हणून आमची ते जबाबदारी आहे. जो कोणी निरप्राध आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. चुकीच्या काम बिलकुल होणार नाही. परंतु चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळून आला त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले आहे.
पूर्वी इयत्ता चौथी आणि सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होत होती. त्यानंतर पाचव्या आणि आठव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. मात्र, आता यानंतर इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा संकल्प दादा भुसे यांनी व्यक्त केला.









