अजित पवारांच्या पुढाकारामुळे बीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती

बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडून चार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड येथे ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’साठी बीड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या सुविधा क्रमांक तीन मधील चार हजार चौरस मीटर जागा तसेच केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळाने घेतला आहे.

या निर्णयामुळे बीड जिह्यातील युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविणे, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन होण्याचा मार्ग खुला झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण बैठका घेऊन ‘सीट्रिपलआयटी’च्या उभारणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. ‘एमआयडीसी’च्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे केंद्रासंदर्भातील त्रिपक्षीय करार आणि प्रकल्पाचे भूमीपूजन लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात नगरपरिषदेतर्फे ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून ‘सीट्रिपलआयटी’ यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. रत्नागिरी येथे औद्योगिक क्षेत्रात ‘सीट्रिपलआयटी’ सुरु करण्यासाठी ‘एमआयडीसी’ला योजना अभिकर्ता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिर्डी येथील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीने निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच धर्तीवर बीड येथील ‘सीट्रिपलआयटी’साठीही एमआयडीसीने निधी उपलब्ध करुन देण्याचा तसेच योजना अभिकर्ता म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. एमआयडीसीचा हा निर्णय बीड जिल्ह्यातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी या वर्षाच्या सुरुवातीला घेतला होता. त्यासाठी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनी बीड जिल्ह्यासाठी 191 कोटी रुपये खर्चून नवीन ‘सीआयआयआयटी’ स्थापन करणार आहे. कंपनीने तशा आशयाचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. या नव्या सेंटरमधून दरवर्षी 7 हजार युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यामुळे बीड जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. ‘सीआयआयआयटी’च्या स्थापनेनंतर पहिल्या तीन वर्षांसाठी प्रशिक्षणाचा खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ उचलणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणाचा खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि जिल्हा प्रशासन दरवर्षी प्रत्येकी पन्नास टक्क्यांप्रमाणे विभागून उचलणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्राला ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि बीड जिल्ह्यासाठी 191 कोटी रुपये खर्चून नवीन ‘सीआयआयआयटी’ स्थापन करण्याची तयारी दर्शविली. 191 कोटींपैकी 15 टक्के म्हणजे 33 कोटी रुपयांचा खर्च बीड जिल्हा प्रशासन करणार असून उर्वरित खर्च ‘टाटा टेक्नॉलॉजी’ आणि त्यांच्या भागीदार कंपन्या, संस्था उचलणार आहेत.