भाजपाची साथ सोडताच अजित पवार यांचा दारूण पराभव

भाजपाची साथ सोडणे अजित पवारांना भोवले, पार्थ पवार यांचा करिश्माही फेल, नेमक काय घडल?

दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ४८ जागांवर मुसडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाने २२ जागा जिंकल्या आहेत. तर दिल्लीत भाजपासोबत फारकत घेऊन लढणा-या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाच्या सर्व २३ उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी २३ उमेदवार उभे केले होते. ते सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत आणि या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. दिल्लीत अजित पवार गटाला फक्त ०.०३ टक्के मते मिळाली. या निवडणूकीची सर्व जबाबदारी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर होती. पण तरीही राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचे राजकीय लाँचिंग पुन्हा एकदा फेल झाले आहे. केंद्र आणि दिल्ली विधानसभेतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे डबल इंजिन सरकार आल्याने दिल्लीच्या सर्वांगीण विकासाला दुप्पट गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच राष्ट्रवादीला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळालं नाही, याची खंत आहे. पण शिकायला खुप मिळाले अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान दिल्लीत सत्ताधारी आपचे पाणिपत झाले आहे.आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. तर मुख्यमंत्री आतिशी यांचा निसटता विजय झाला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना हॅटट्रीक काही करता आली नाही. भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता हस्तगत केली आहे. आता भाजपाकडून मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपाने ४८ जागा जिंकतो एकहाती सत्ता स्थापन केली आहे.