
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी, अजित पवार वगळता इतर मंत्र्यांना स्वजिल्हा पोरका

मुंबई – राज्य सरकारकडून दोन दिवसांपूर्वी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ३६ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. आता या पालकमंत्रीपदावरुन काही मंत्री नाराज झाले आहेत. पण यात अजित पवार गटाला कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे.

पालकमंत्री वाटपात सर्वाधिक पालकमंत्री स्वत:कडे ठेवली आहेत. तर शिंदे गट आणि अजित पवार गटालाही पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. पण यावेळी अनेक नेत्यांना स्वतचा जिल्हा सोडून लांबचा जिल्हा देण्यात आला आहे. खासकरून अजित पवार गटात केवळ अजित पवार सोडले तर एकाही मंत्र्याला स्व:तचा जिल्हा मिळालेला नाही. अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. पण नंतर ते रद्द करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी आहे. ज्या मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळाले आहे. त्यामध्ये अनेकांना दूरचा जिल्हा देण्यात आला आहे. त्यामुळे पक्षात नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:साठी आणि सुनील तटकरे यांनी लेकीपुरते पाहिले. परंतु पक्षातील इतर मंत्र्यांना त्यांचे जिल्हे मिळविण्यासाठी प्रयत्न केले नाही, अशी भावना मंत्र्यांमध्ये झाली आहे. भाजपच्या २० पैकी ७ आणि शिवसेनेच्या १२ पैकी ७ मंत्र्यांना स्वजिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले गेले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० पैकी केवळ एक म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वजिल्हा मिळाला आहे.
लांबचा जिल्हा मिळालेले पालकमंत्री
कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना ६२५ किमी लांब असलेला वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळालं आहे.
नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना १९५ किमीवरचा नंदूरबार जिल्हा मिळाला.
साताऱ्याचे मकरंद पाटील यांना ४५० किमीवरचा बुलढाणा जिल्हा देण्यात आला आहे.
नाशिकच्या नरहरी झिरवाळ यांना ४४५ किमीवरचा हिंगोली जिल्हा दिला आहे.
लातूरच्या बाबासाहेब पाटील यांना ६३६ किमीवरचा गोंदिया जिल्हा दिला गेला आहे.









