अजित पवारांची महाविकास आघाडीच्या घोषणांवर टीका ; म्हणाले,’महाविकास आघाडीच्या घोषणा…

महायुतीची वाढती ताकद पाहून महाविकास आघाडीकडून फसव्या घोषणा केल्या जात आहेत. आम्ही केलेल्या लाडकी बहीण योजना, मोफत तीन सिलिंडर, विद्यार्थ्यांना स्टायपेंड अशा विविध योजनांसाठी ७५ हजार कोटी खर्च येतो.या योजनांचे यश पाहून महाविकास आघाडीने फसव्या घोषणा केल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

माजी आमदार जगदीश मुळीक, अर्जुन गरुड, दीपक मानकर, प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक योगेश मुळीक, उषा कळमकर, अशोक कांबळे, तसेच रुपाली ठोंबरे, सतीश म्हस्के, संगम शंकर, अर्जुन जगताप, सुनील जाधव, नारायण गलांडे, प्रकाश भालेराव, बाळासाहेब जानराव, अशोक खांदवे, संतोष खांदवे, चंद्रकांत जंजिरे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.पवार म्हणाले, की निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या फसव्या योजनांसाठी राज्य सरकारला तीन लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन व राज्याचे राहिलेल्या कर्जाचे व्याज यासाठी सुमारे साडेतीन लाख कोटी खर्च होतो. राज्याचे उत्पन्न सुमारे साडेसहा लाख कोटी आहे. मग पैसेच शिल्लक राहिले नाहीत, तर विरोधक विकासकामे कुठून करणार आहेत.

निवडणुकांच्या तोंडावर विरोधक फूट पाडण्याचे, दमदाटी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही पवार यांनी या वेळी दिला. वडगाव शेरीत वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, रस्ते, उद्याने, आरोग्य सेवा यांसाठी भरीव निधी आणला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी झपाटून काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी कार्यकर्त्यांना केले.