अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपदाची मागणी; ‘या’ आमदारांना मिळणार संधी

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे.निकाल जाहीर होऊन आज चौथा दिवस उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत नाही.त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असे अनेक सवाल राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांना पडला आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री पदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात असताना एकनाथ शिंदे यांनीही आज या शर्यतीतून माघार घेतल्याची माहिती पुढे आली आहे.दुसरीकडे अजित दादांच्या राष्ट्रवादीतून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालंय. महायुतीने महाविकास आघाडीला पराभव करत २३६ जागा मिळवल्या आहेत.दरम्यान महायुतीने मोठा विजय मिळवला असला तरी अद्याप मुख्यमंत्रि‍पदाबाबतचा निर्णय झालेला नाही. मात्र, आज एकनाथ शिंदे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, ते मान्य असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आधीपासूनच मवाळ भूमिका घेणार्या अजित दादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री पदाची मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे. अजित पवारांची हि मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी ७ जणांना पुन्हा संधी मिळण्याची ही शक्यता आहे. यामध्ये धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा अत्राम, अजित पवार, छगन भुजबळ या सात नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता असून अशी माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. त्यामुळे या पदावर आता कुणाची वर्णी लागते ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.