भाजपच्या नाराजीचा फटका अजितदादांना बसला; रुपाली पाटील यांचा जोरदार पलटवार

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात मुसंडी मारली. महायुतीचा अनेक मतदारसंघात धुव्वा उडाला. महायुतीत या पराभवाने चलबिचल सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात अजित पवार यांच्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याचे खापर फोडण्यात आले.आता भाजपच्या काही आमदारांनी पण हाच सूर आळवला आहे. दादांना सोबत घेतल्यानेच अनेक मतदारसंघात महायुतीला फटका बसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपांना अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी खणखणीत उत्तर दिले आहे.

महायुतीत आम्ही ज्या विकासाच्या मुद्यावर लोकांची कामं करण्यासाठी म्हणून गेलो. संघाच्या बैठकीत जी काही चर्चा ती त्यांची अंतर्गत आहे.मात्र अजित दादांना घेऊन त्यांचं काही नुकसान झालं नाही. पण भाजपवरची जी काही नाराजी आहे त्याचा फटका अजित पवारांना बसला हे म्हणणं योग्य असल्याचा भीमटोला रुपाली पाटील यांनी हाणला. पुन्हा सांगते भाजपचा जो 400 चा नारा होता संविधान बदलणार नरेटीव्ह होता. हे आम्ही पहिल्यापासून भाजपा आणि शिंदे गटाला सांगत होतो. भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्यामुळे फटका बसला आहे अजित पवारांमुळे नाही, असे सणसणीत उत्तर त्यांनी दिले. हे सगळ्या महायुतीला माहित असल्याचे त्या म्हणाल्या.

सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटात येण्याची ऑफर रुपाली पाटील यांना दिली होती. याविषयीचे ट्वीट त्यांनी केले होते. आज मुंबईत रुपाली पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी तुमची काय मुस्कटबाजी होत आहे, अशी विचारणा अजितदादांनी केल्याचे त्यांनी सांगितले. आपण अजित पवार गटातच असल्याचे त्या म्हणाल्या.जो काही मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला होता, त्यात संविधानात्मक भूमिका मांडली आहे. हे जे काही अपयश आलेलं आहे ते अजित दादांवर फोडण्यासारखं नाही. अंतर्गत बैठकीत कुठलाही कार्यकर्ता त्याचे मत मांडू शकतो. लोकांमध्ये उभे राहून अजित पवार काम करतात. विरोधक जाणीवपूर्वक बातम्या पेरतात.अजितदादा राजकारणात एकटे पडणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.