सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत आणि त्यासाठीच उदयनराजेंनी दिल्ली गाठलीय. उदयनराजे केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. भाजप खासदार उदयनराजे भोसले गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत तळ ठोकून आहेत. सातारा लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे इच्छुक आहेत आणि म्हणूनचं ते दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी उदयनराजे दिल्ली मोहिमेवर आहेत.
खरं तर काही दिवसांपूर्वीचं भाजपनं महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्या 20 जणांच्या यादीत उदयनराजेंचं नाव नव्हतं, त्यामुळे सातारा लोकसभा उमेदवारीवरून संभ्रम कायम असल्याचं चित्र आहे. भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव न आल्यामुळे उदयनराजे नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान उदयनराजेंनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती, त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चाही झाली होती, पण त्या चर्चेनंतरही सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरून तोडगा निघाला नाही आणि त्यामुळेच उदयनराजेंनी दिल्ली गाठली आहे.
भाजपने सातारा लोकसभा मतदार संघातून उमेदवार जाहीर न करण्यामागे महायुतीचं जागा वाटप असल्याचं बोललं जातं. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटलांनी उदयनराजेंचा पराभव केला होता, त्यामुळे अजित पवारांनी सातारा लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे आणि म्हणूनचं भाजपने साताऱ्यातून उमेदवाराची घोषणा केली नसल्याचं बोललं जातंय. उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र उदयनराजेंनी तो प्रस्ताव फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं सातारा लोकसभेवर दावा केल्यामुळे उदयनराजेंची उमेदवारी धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीर दिल्लीत उदयनराजे- अमित शाह भेटीला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे.