उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीची अंतिम यादी समोर ; ‘या’ पक्षाला मिळाल्या इतक्या जागा

विधानसभा निवडणुकीतून अनेक बंडखोर नेत्यांनी माघार घेतल्याने आता महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्मुला समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राज्यात २८८ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

त्यातील २८७ जागांवर महाविकास आघाडीने उमेदवार दिले असताना उत्तर कोल्हापूरच्या जागेवर मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा दिला आहेराज्यभरातील लढवण्यात येणाऱ्या २८८ जागांमध्ये काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष असून १०१ जागांवर काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार दिले आहेत. तर त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने ९२ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ८६ जागांवर उमेदवार दिले आहेत.

त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये आठ जागा या मित्र पक्षांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला तीन जागा सोडण्यात आल्या असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा तीन जागा देण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीने दोन जागा समाजवादी पार्टीला दिल्या आहेत.मुंबईत शिवसेना ठाकरे गट एकूण २२ जागांवर निवडणूक लढणार आहे. तर काँग्रेस पक्ष हा अकरा जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष हा दोन जागांवर, समाजवादी पार्टी एक जागेवर निवडणूक लढवणार आहे