(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – पासवर्ड कोणाला समजणार नाही असा ठेवा, तो कोठे लिहून ठेवू नका, असे सांगितले जाते. चोरट्याने मोबाईल चोरुन नेल्यानंतर त्याला पासवर्ड मिळाल्याने त्याने ‘फोन पे’ व ‘गुगल पे’ वरुन तब्बल दीड लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अशरफ कुरबान अन्सारी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या बाहेर तिकीट खिडकीजवळ ११ जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना जबलपूरला जायचे असल्याने ते पुणे रेल्वे स्टेशनला १० जुलै रोजी आले होते. परंतु, जबलपूरला जाणारी रेल्वे निघून गेल्याने दुसर्या दिवशीच्या गोदावारी एक्सप्रेसने जाण्याचे त्यांनी ठरविले. स्टेशनच्या तिकीट काऊंटरच्या बाहेर असणार्या कटट्यावर ते बसले होते. त्यावेळी एक जण त्यांच्याशी बोलू लागला. त्याने मलाही जबलपूरला जायचे असल्याचे सांगितले. फिर्यादीबरोबर तो तिकीट काऊंटरच्या बिल्डिंगमध्ये झोपला होता.
त्या दरम्यान त्याने फिर्यादीकडे दोन तीनदा मोबाईल मागितला. त्यावर काहीतरी चेक करुन परत दिला होता. फिर्यादीच्या मोबाईलवरुन त्याने २२ रुपयांचा रिचार्जही केला होता. दुसर्या दिवशी दुपारी तिकिट खिडकीच्या एका बाजूला फिर्यादी तर बॅरिकेटच्या दुसर्या बाजूला तो होता. तेव्हा त्याने गाडीचा वेळ पाहण्यासाठी मोबाईल मागितला. फिर्यादीने मोबाईल देण्यास नकार दिल्याने त्याने जबरदस्तीने मोबाईल हिसकावून तो पळून गेला. दुसर्या दिवशी त्यांनी नवीन सीमकार्ड घेऊन दुसर्या मोबाईलमध्ये टाकल. तेव्हा त्यांच्या मोबाईलमधून गुगल पेद्वारे १२ हजार रुपये तर फोन पेद्वारे क्रेडिट कार्डवरुन १ लाख १९ हजार रुपये ऑनलाईन काढल्याचे आढळून आले. गावाहून आल्यानंतर आता त्यांनी चोरट्याने १ लाख ५१ हजार रुपये चोरुन नेल्याची फिर्याद दिली आहे. पोलीस तपास करीत आहेत.