एकनाथ शिंदेनंतर भाजपाचा अजितदादांना पुणेरी दणका?

पुणे – खातेवाटपाचा विषय निकाली लागल्यानंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, यावरून महायुतीत अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातही पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून भाजपा आणि राष्ट्रवादीत स्पर्धा रंगली आहे. पण भाजपा अजितदादांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यापैकी पुण्याचे पालकमंत्रिपद कुणाकडे जाणार, याविषयीची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून आहे. पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? असं चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारलं असता त्यांनी सूचक भाष्य केलं. “माझा पक्ष आणि माझं नेतृत्व मला जे सांगेल ते मी स्वीकारतो”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भाजप स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे आक्रमक झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेण्याबरोबरच दिल्लीतही फिल्डिंग लावली होती. पण २०२२ साली आम्ही त्याग केला होता. आता तुम्ही त्याग करा असे सांगत भाजपाने त्यांची मागणी धुडकावून लावली होती. आता एकनाथ शिंदे यांच्यानंतर भाजपा अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. आपला स्थानिक पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी पुण्याचे पालकमंत्रीपद भाजपा स्वतःकडे घेणार आहे. कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आणि महत्वाचे म्हणजे याठिकाणी भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी आहे. त्यामुळे भाजपा कोणत्याही परिस्थितीत अजितदादांना संधी देणार नसल्याची शक्यता जास्त आहे. मागील सरकार मध्ये अजित पवारांनी भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला नव्हता. त्यामुळे भाजपा आक्रमक झाली होती. त्यामुळे खातेवाटपानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीत मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याचा पालकमंत्री कोणता दादा होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे महायुतीतील सूत्रांनी सांगितले. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे.