चालताना धक्का लागल्याने तरुणाचे आधी अपहरण नंतर मारहाण आणि….

वाघोली येथे रोडवर भाजी खरेदी करण्यासाठी पायी जाताना धक्का लागल्याने झालेल्या वादात तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण केली. गाडीतून अपहरण करुन नेले, तेथे गुगल पेवरुन पैसे घेतल्यानंतर मारहाण करुन जखमी केले. लोणीकंद पोलिसांनी ९ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत लुकमान हासमत हश्मी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम नथुराम जाधव, आनंदा हनुमंत पाटील यांच्यावर त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वाघोली येथील चोखीदाणी रोडवरील दुर्गामाता मंदिर येथे रविवारी सायंकाळी ६ ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे चुलत भाऊ भाजी खरेदी करण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी एका १७ वर्षाच्या मुलाने फिर्यादीच्या खांद्याला धक्का दिला, म्हणून फिर्यादीने त्यास पाहून चालत जा, असे म्हणाले. त्याचा राग मनात धरुन त्या मुलाने शुभम व आनंदा तसेच आणखी एका साथीदाराने फिर्यादी व त्यांच्या बरोबरील समीर व विवेक अशा तिघांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांनी फोन करुन आणखी साथीदारांना बोलावून घेतले.

त्यांना स्विफ्ट गाडीत जबरदस्तीने बसवून पोदार कॉलेज येथील नवीन बांधकाम साईवर नेले. गाडीचे नुकसान झाले आहे, असे सांगून त्या बदल्यात पैशांची मागणी केली. फिर्यादी यांचे चाचा अजिज अहमद यांचे गुगल पेवरुन १८ हजार रुपये गाडीवरील चालकाचे गुगल पे अकाऊंटवर जबरदस्तीने घेतले. फिर्यादी यांना लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. समीश हश्मी यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. समीर याच्या डाव्या हाताला व विवेक गोस्वामी याच्या डोक्यात मारुन जखमी केले. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.