२ अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन, सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक

रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा पाठलाग केला. एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला मिठी मरत तिच्या सोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार मुंढवा परिसरात घडला आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार २८ जून रोजी रात्री सातच्या सुमारास पिडीत मुलीच्या घराजवळ घडला आहे.

याबाबत ३८ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्षवर्धन मोहन रेड्डी वय १९ याच्यावर आयपीसी ३५४ (ड), पोस्को ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात १४ तर हडपसर पोलीस ठाण्यात एक असे एकूण १५ वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची १४ वर्षाची मुलगी व ननंदेची १३ वर्षाची मुलगी परिसरातील मेडिकलमध्ये औषध आणण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपीने दोन्ही मुलींचा पाठलाग केला. तसेच त्यांना बोलावून घेत मोबाईलवर बोलत असल्याचे भासवले. मेडिकलमधून औषध घेऊन मुली घरी येत असताना आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीचा हात पकडून तु मला खुप आवडते असे म्हणून तिला अश्लील स्पर्श केला. मुलीने याबाबत घरी सांगणार असल्याचे सांगितल्यावर त्याने तिचा हात पकडून भररस्त्यात मिठी मारुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पिडीत मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.