फुरसुंगीच्या नगराध्यक्ष पदाच्या आपच्या उमेदवाराला धमकी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी मंगळवारी (ता.२) राज्यात मतदान झाले.पुणे जिल्ह्याती बारामती आणि फुरसुंगी त्याला अपवाद राहिले.दरम्यान,फुरसुंगी-उरुळी देवाची येथील नगराध्यक्ष पदाचे आम आदमी पार्टीचे (आप)उमेदवार यशवंत बनसोडे यांना ‘निवडणूकीतून माघार घे,नाही,तर तुझा संतोष देशमुख करू’असे सोमवारी (ता.१) धमकावण्यात आल्याने फुरसुंगीच नाही,तर पुण्यातही मोठी खळबळ उडाली.याबाबत फुरसुंगी पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात काल गुन्हा दाखल झाला.मात्र,अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

फुरसुंगीत येत्या २० तारखेला मतदान आहे.त्याचा गैरफायदा घेऊन काल ही धमकी देण्यात आली.त्याबाबत आप चे उमेदवार यशवंत अरुण बनसोडे (वय 42,रा.राजमाता सिंधुनगरी पोलीस कॉलनी, भोसले व्हिलेज, फुरुसंगी, ता. हवेली जि.पुणे) यांनी स्वत याबाबत काल फिर्याद दिली.ते पत्रकार असून पुण्य प्रहार नावाचे मराठी साप्ताहिक चालवितात.काळेपडळ येथील पैलवान जीममधून आपल्या मोटारीतून (MH-14-JE-3793)परत येताना सकाळी साडेआठ वाजता त्यांना धमकावण्यात आले.भोसले व्हिलेज जवळ त्यांची गाडी एका हत्यारधारी व्यक्तीने अडवली.त्यांनी काच खाली केली असता तु निवडणुकीतून माघार घे, नाहीतर तुझा संतोष देशमुख करु,असे त्यांना धमकावण्यात आले.त्याचा दुसरा साथीदार हा रेल्वे पटरीजवळ उभा होता,असे बनसोडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.या दोघांचेही वर्णन त्यांनी पोलिसांना दिले आहे.

दरम्यान,या धमकीने घाबरून न जाता अशा साम-दाम-दंडच्या नीती विरोधात उभे राहून प्रस्थापितांशी दोन हात करण्याची ताकद आप निश्चित आहे,असे या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले.साम दाम दंड या प्रस्थापित राजकारणाच्या नीतीविरोधात उभे राहण्याचे धाडसही आम्हा पार्टीच्या कार्यकर्त्यांत आहे.असे त्यांनी निक्षून सांगितले.आम्ही अशा कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही,असे ते म्हणाले.महाराष्ट्र आणि विशेषत पुणे परिसर आता गुंडगिरीचा अड्डा बनत चालल्य़ाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.कुठल्याही दडपशाहीच्या विरोधामध्ये आम्ही आमच्या उमेदवारासोबत खंबीरपणे उभे राहू ,असा निर्धार व्यक्त करीत आमचे कार्यकर्ते सुद्धा या लढाईसाठी सक्षम आहेत,असे आव्हान केले