
द्वारका भागात हॉर्न वाजविल्याच्या वादातून एकाने खासगी बसचालकास लोखंडी टॉमीने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत चालक जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन रतन धनाईत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. धनाईत खासगी ट्रव्हल्स बसवरील चालक असून शुक्रवारी (दि.१३) ते द्वारका परिसरातील उज्वल फोर्स ट्रव्हल्स सर्व्हीस सेंटर येथे गेले होते. सर्व्हीस रोडने ते आपले वाहन चालवून नेत असतांना वाटेत अन्य वाहने वेडीवाडकी पार्क केलेली होती. त्यामुळे त्यांनी हॉर्न वाजविला असता ही घटना घडली.

ए.के. ट्रव्हल्स मध्ये उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ करीत येवून धनाईत यांच्या वाहनाचा दरवाजा उघडून ही मारहाण केली. चालक सिटाखाली ठेवलेली टामीने धनाईत यांना मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.









