
वानवडीतील लुल्लानगर भागात असलेल्या लष्कराच्या मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून तरुणाची ओळख पटवण्यात येत आहे वानवडीतील लुल्लानगर भागात लष्कराची विक्रम बात्रा वसाहत आहे. वसाहतीच्या परिसरात केंद्रीय विद्यालय आहे. या भागात लष्कराची मोकळी जागा आहे. मोकळ्या जागेत ३० ते ३५ वर्षांचा तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट यांनी घटनास्थळी भेट दिली.

तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे उघडकीस आले. तरुणाची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार संदीप वाघ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट तपास करत आहेत.









