मावस भावाला का मारले, याचा जाब विचारल्याने तरुणाला टोळक्याची बेदम मारहाण..

पुणे – मावस भावाला का मारले, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला टोळक्याने डोक्यात लाकडी बांबुने मारहाण करुन जखमी केले. याबाबत अभिषेक विष्णु खंडागळे (वय १९) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, पोलिसांनी राहुल सत्यप्रेम थोरात, सहीम ऊर्फ मुन्ना हनिफ शहा, प्रतिक मुटके आणि सुरज सत्यप्रेम थोरात यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  ही घटना गोकुळनगर पठार येथील के के मार्केट दुकानासमोर २० ऑगस्ट रोजी सव्वा सहा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामावरुन घरी जात होते. त्यांचा मावस भाऊ सोहया मोरे व आदी यांची १२ ऑगस्ट रोजी किरकोळ भांडणे झाली होती. त्या भांडणाच्या कारणावरुन राहुल सत्यप्रेम थोरात व इतरांनी सोह्या मोरे याला मारहाण केली होती. ही गोष्ट सोह्या मोरे याने फिर्यादी यांना भेटून सांगितली.

तेव्हा मित्राच्या गाडीवर त्याला बसवून फिर्यादी जाब विचारण्यासाठी गोकुळनगर पठार येथे गेले. त्यावेळी फिर्यादी यांचे काही एक ऐकून न घेता सुरज थोरात, राहुल सत्यप्रेम थोरात, प्रतिक मुटके यांनी त्यांना हाताने मारहाण केली. सहीम शहा याने त्याच्या हातामध्ये असलेला लाकडी बांबु डोक्यात घातला. त्यामुळे फिर्यादी यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून तेथे जमलेल्या लोकांनी भांडणे सोडवून फिर्यादी यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले.