मोटारसायकल पाडल्याचा जाब विचारल्याने तरुणाला शिवीगाळ करत केले कोयत्याने वार..

पिंपरी – उभी असलेली मोटारसायकल लाथ मारुन पाडल्याने त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी शरद विलास ढोरे (वय ३७) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आकाश ऊर्फ गणेश दत्तु काळे याला अटक केली आहे. हा प्रकार कुरकुंडी गावातील विठ्ठल मंदिराजवळील नितीन गांधी यांच्या किराणा दुकानासमोर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी नितिन गांधी यांच्या किराणा दुकानासमोर आपली मोटारसायकल उभी केली होती. आकाश काळे हा तेथे आला व त्याने मोटारसायकलला लाथ मारुन ती खाली पाडली. हे पाहून फिर्यादी यांनी माझी मोटारसायकल का पाडली असे विचारले. या कारणावरुन त्याने फिर्यादीचे शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने कमरेला खोचलेला कोयता बाहेर काढून फिर्यादीचे डाव्या खांद्यावर, पाठीवर, उजवे बाजूस, डावे हाताचे तळहातावर वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलीस हवालदार दिघे तपास करीत आहेत.