
पुणे – दुकानासमोर गप्पा मारत उभे राहू नको, असे सांगितल्यावरही न ऐकल्याने दुकानदाराने तरुणाच्या पोटात चाकूने वार करुन जबर जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अंकुश राम मगर (वय ३८) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी फरहाज अक्रम कुरेशी (वय २८) याला अटक केली आहे. ही घटना भवानी पेठेतील दिनशी अपार्टमेंट येथे गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अनिल हे दोघे दिनशी अपार्टमेंट समोर गप्पा मारत उभे होते. तेथेच फरहाज कुरेशी याचे लब्बाईक चिकन सेंटर आहे. हे उभे असताना कुरेशी याने ‘इथे माझ्या दुकानाशेजारी थांबून बडबड करुन नका, दुसरीकडे जावा,’ असे सांगितले.

त्यावर फिर्यादी यांनी ‘तुझ्या दुकानाच्या समोर उभा नाही राहिलो,’ असे बोलले. त्यावर त्याने शिवीगाळ करत ‘इथे कशाला येऊन बसतो,’ असे म्हणून त्याने चिकन सेंटर दुकानामधील चाकू घेऊन बाहेर आला.रागाने फिर्यादी यांच्या पोटालगत चाकूने वार केला. चाकू लागल्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागल्याने फिर्यादी आरडाओरडा करु लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची आई व तेथील रहिवासी आले. त्यांनी फिर्यादी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन फरहाज कुरेशी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करीत आहेत.









