रस्त्यावर साईड देण्यासाठी तरुणाने हॉर्न वाजविला ; संतापलेल्या कारचालकाने तरुणाला केली बेदम मारहाण

वस्तीवर जाणारा रस्ता अरुंद असल्याने साईड देण्यासाठी हॉर्न वाजविल्याने कारमधील चौघांनी दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत जखमी झालेला तरुण गेल्या एक महिन्यांपासून उपचार घेत आहे.

बापूराव निवृत्त मारकड (वय ४४) यांनी बारामती येथील पवार हॉस्पिटलमधील आय सी युमधून वालचंदनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दीपक राजेंद्र वाघमोडे व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुलाच्या लग्न पत्रिका पाहुण्यांना वाटण्याकरीता मोटारसायकलवरुन १२ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता जात होते. त्यांच्या पुढे नंबर प्लेट नसलेली स्विफ्ट कार जात होती. रस्ता अरुंद असल्याने त्यांनी साईड साठी हॉर्न वाजविला. पण कारचालकाने साईड दिली नाही. काही अंतर गेल्यावर कार मधोमध थांबली. त्यातून त्यांच्या शेजारी राहणारा दीपक वाघमोडे व इतर तिघे जण उतरले. दीपक याने फिर्यादी यांना ‘तुला माज आला आहे का’ असे म्हणून हातातील लोखंडी रॉडने वार केले. त्यांनी ते हुकवले. दुसरा वार त्यांच्या हातावर बसला. इतरांनी हातातील काठ्या व प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केली.

फिर्यादी खाली पडून त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने वस्तीवरील काही जण पळत आले. तेव्हा दीपक म्हणाला, ‘माझ्या नादी लागला तर तुला जिवंत ठेवणार नाही,’ असे म्हणून फिर्यादीच्या मोटारसायकलची मोडतोड करुन ते पळून गेले. लोकांनी त्यांना वालचंदनगर पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांना फिर्याद दिल्यानंतर त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेले. जवळपास महिन्याभरानंतर वालचंदनगर पोलिसांनी दखल घेऊन रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.