खड्ड्यातील पाणी उडाल्याने एका तरुणाने रिक्षा चालकावर केला खुनी हल्ला

खड्ड्यातील पाणी रिक्षामुळे अंगावर उडाल्याच्या रागातून शाहबाज उर्फ नानू खान या दुचाकी चालकाने शाकीर शेख या रिक्षा चालकावर चाकूने खुनीहल्ला केल्याची घटना घडली.या प्रकरणी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी रविवारी दिली.

शाकीर शेख हे १२ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ठाणे स्टेशन येथून आनंदनगर, उन्नती ग्रीन्स, कासारवडवलीकडे भाडे घेऊन निघाले होते. ठाण्याकडून घोडबंदरकडे जात असताना, विजय गार्डन सिग्नल, पंचामृत सोसायटीसमोरील रस्त्याने ते घाेडबंदर रोडवरून जात होते. त्यावेळी हावरे सिटी रोड, ज्ञानगंगा कॉलेजसमोर घोडबंदर रोडवर मुख्य मार्गावर पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यांच्या रिक्षाच्या उजव्या बाजूचे चाक रस्त्यावरील याच खड्ड्यातून गेले.

हे चाक खड्ड्यातून गेल्यामुळे खड्ड्यामधील पाणी त्यांच्या उजव्या बाजूने मोटारसायकलवरून जाणाऱ्या शाहबाज याच्या गाडीवर आणि अंगावर उडाले. याच कारणावरून मोटारसायकलवरील खान या दुचाकीस्वाराने त्यांची रिक्षा थांबवून वादावादी केली. त्यांच्यात एकमेकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. याच रागातून खान याने त्याच्याकडील चाकूने शेख या रिक्षा चालकाच्या पाठीवर चाकूने वार करून धक्काबुक्की केली. रिक्षा चालकावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, शाहबाज खान याच्याविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.