पार्किंगच्या वादातून चारचाकी गाडीची तोडफोड करुन महिलेला धमकी..

 पार्किंगच्या वादातून चारचाकी गाडीची काच फोडून नुकसान केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला अश्लील शिवीगाळ करुन धमकी दिल्याची घटना पिसोळी परिसरात घडली आहे.

ही घटना बुधवारी दि.२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास पिसोळी येथील एका सोसायटीच्या पार्कींगमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ४० वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बाबासाहेब देशमुख व आकाश देशमुख यांच्यावर आयपीसी ५०९, ५०६,४२७,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच सोसायटीत राहत असून ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी त्यांची अल्टो कार सोसायटीच्या पार्कींगमध्ये लावली होती. आरोपींनी कारच्या काचा फोडून नुकसान केले.

कारची काच फोडल्या बाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपी आकाश याने त्यांच्या पतीला आरेरावी केली. त्यावेळी फिर्यादी यांनी पार्कींगच्या जागेची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपी राहुल आणि आकाश यांनी सार्वजनिक जागेत गोंधळ घालून महिलेला अश्लील शिवीगाळ केली. तसेच फिर्य़ादी यांच्या पतीला तु सोसायटीच्या बाहेर भेट मी तुला दाखवतो अशी धमकी दिली. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.