
पावसाळा सुरु झाल्याने अनेक पर्य़टक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. पुण्याजवळील किल्ले, धबधवे, घाटरस्ते येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र, पर्य़टकांच्या अतिधाडसामुळे दुर्घटना घडत आहेत. ताम्हिणी येथील मिल्की बार धबधबा येथे पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

आदेश जितेंद्र पवार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.ताम्हिणी परिसरातील प्लस व्हॅलीमधील मिल्की बार धबधबा येथे तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मृतदेह बाहेर काढण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग संघ, माणगाव आपत्ती व्यवस्थापन पथक, मुळशी आपत्ती व्यवस्थापनाचे तरुण, वनविभाग, पोलीस आणि गिरीप्रेमी यांनी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन केले.

मृत आदेश पवार नाशिकच्या मित्रांबरोबर ताम्हिणी परिसरात पर्यटनासाठी गेला होता. धबधब्याला भरपूर पाणी आल्याने पोहताना अंदाज न आल्याने आदेशचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. खोल दरीमध्ये मृतदेह असल्याने बचावकार्यही अनेक तास सुरु होते. रात्री अकरा वाजता मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती बचाव पथकांकडून देण्यात आली.
समाज माध्यमांवरील रील्स पाहून ही मित्रमंडळी पर्यटनासाठी ताम्हिणी परिसरात आली होती. नागरिकांनी समाजमाध्यमांवरील आशय पाहून पर्य़टन करण्याचे धाडस करु नये. ताम्हिणी घाट आणि परिसरातील रस्ते निसरडे झाले असून स्थानिक किंवा परिसराची माहिती असणाऱ्या व्यक्ती सोबत घ्यावी, असे आवाहन बचाव पथकांनी केले आहे.









