नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये नाशिक त्र्यंबकरोड पिनॅकल मॉल जवळ एका शिवशाही बसने ४ ते ५ वाहनांना धडक दिली आहे. बस चालकाचा ब्रेकच्या जागी एक्सेलटर वर पाय पडला आणि ही दुर्घटना घडली.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघातग्रस्त शिवशाही बस नाशिक त्र्यंबकरोड पिनॅकल मॉलजवळ आली असता बस चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र चुकून ब्रेकऐवजी एक्सीलेटर पाय पडला आणि बसचा वेग अचानक वाढला. यात समोरच्या पाच वाहनांना बसची धडक बसली. तर दोन दुचाकी बसखाली आल्या. दुचाकी बससोबत फरफटत गेल्या.
सुदैवाने प्रसंगावधान राखत दुचाकीस्वार दुचाकीसोडून बाजूला झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.