अनैतिक संबंधात मुलगा ठरला अडथळा! प्रियकराच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलाला कायमचे संपवले; महिलेला अटक, प्रियकर फरार

अनैतिक संबंधात मुलाचा अडथळा होत असल्याने प्रियकराच्या मदतीने आईनेच मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनिल लालसिंग ठाकुर (वय ३०) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सुमित्रा लालसिंग ठाकुर (वय ५५) हिला अटक केली आहे़ तर तिचा प्रियकर प्रफुल पुंडलिक ताथोड (वय ३५) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ठाकूर हा काही कामधंदा करत नसे. त्याला दारुचे व्यसन होते. अनिलची आई सुमित्रा हिचे त्यांच्याच परिसरात राहणारा आरोपी प्रफुल सोबत अनैतिक संबंध होते. याची अनिलला कुणकुण लागल्याने त्यांच्यात भांडणे होत होती. गुरुवारी मध्यरात्री त्यांच्यात भांडणे झाली. त्यात सुमित्रा हिने प्रफुल याच्या मदतीने अनिल च्या डोक्यात दगड घातला. त्यात त्याचा मृत्यु झाला.

अनिल याचा मृत्यु झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली. ते सर्व जण गुरुवारी त्यांच्या घरी जमले होते. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांपैकी एकाने सुमित्रा ठाकुर हिच्या अनैतिक संबंधाची माहिती पोलिसांना फोन करुन कळविली. पोलिसांनी सुमित्रा हिच्याकडे चौकशी केल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली असून प्रफुल ताथोड याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक नितेश घोरपडे तपास करीत आहेत.