
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पोर्श कार अपघाताप्रकरणात एक नवी अपडेट समोर आली आहे. दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या ‘त्या’ अल्पवयीन आरोपीला अखेर जामीन मिळाला आहे.

मुंबई हायकोर्टाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला. अल्पवयीन आरोपीचे आई-वडील जेलमध्ये आहेत. त्यामुळे अल्पवयीन तरुणाला आत्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना कोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. पहिल्यांदा जामीन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. तसेच अल्पवयीन आरोपीचे आई-वडील सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्याचा ताबा आता त्याच्या आत्याकडे देण्यात यावा, असं कोर्टाने म्हटलं. मुंबई हायकोर्टाच्या या आदेशामुळे आता अल्पवयीन आरोपीची ३३ दिवसांनी बालसुधारगृहातून सुटका होत आहे. मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे या घटनेत मृत्यू पावलेल्या अनिश अवधिया या तरूणाची आई मात्र खूप नाराज आहे.

न्यायाधीश आणि संपूर्ण यंत्रणा अल्पवयीन आरोपीच्या वेदना पाहू शकते, पण आमची वेदना का दिसत नाही ? असा सवाल मृत्यू पावलेल्या तरूणाच्या आईने विचारला आहे . या अपघातात जीव गमावणाऱा अनिश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तरण्याताठ्या मुलाच्या मृत्यूने त्याची आई खचून गेली आहे. न्यायालयाच्या या जामीनाच्या निर्णयामुळे आम्ही खूप निराश झालो आहोत. त्या अल्पवयीन आरोपीला फाशी व्हावी , अशी काही आमची इच्छा नाही. पण त्याला कठोर शिक्षा तर मिळालीच पाहिजे, की तो पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.









