मद्यधुंद तरुणाने हॉटेलमध्ये घातला गोंधळ ; हॉटेल बंद करण्यास विरोध, पोलिसांसह डॉक्टरांची पकडली कॉलर

पुणे – मद्यधुंद तरुणाने गोंधळ घालून हॉटेल बंद करण्यास विरोध केला. पोलिसांनी समजाविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवीगाळ केली. तेव्हा त्याला अटक करुन ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले तर तेथे त्याने डॉक्टरांची कॉलर पकडली. मोहम्मद शौकत अली सय्यद (वय ३२) असे या मद्यधुंद तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाड यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे मार्शल म्हणून ८ सप्टेबर रोजी रात्री कर्तव्यावर होते. मध्यरात्री १ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास जीपीओ चौकासमोरील विक्रम हॉटेल येथील वेटर दौलत यांनी एका जण हॉटेलमध्ये दारु पिऊन गोंधळ करुन शिवीगाळ करत आहे. हॉटेल बंद करण्याची वेळ झालेली असताना हॉटेल बंद करण्यास विरोध करत आहे, असे कळविले. फिर्यादी सहकार्‍यासह तेथे पोहचले. फिर्यादी यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना तो शिवीगाळ करु लागला.

बाहेर थांबलेल्या ग्राहकाला विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादींनी अडविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची कॉलर सय्यद याने पकडली. पोलीस उपनिरीक्षक खेडकर यांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. तेथेही तो मोठमोठ्या आवाजात आरडाओरडा करत होता. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले.आपत्कालीन विभागातील डॉ. सुदर्शन यांच्या शर्टची कॉलर त्याने पकडली. त्यांना शिवीगाळ करु लागला. डॉक्टरांनी त्यांचा लेखी अहवाल दिल्यावर त्याच्याविरोधात मद्यपान करुन गोंधळ घातला. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.