
मद्यपान करून भरधाव वेगात रिक्षा चालवून चालकाने महिलेला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शेवाळवाडी भाजी मार्केटच्या समोर घडली. अपघातात महिलेचा मृत्यू झाला.

सारिका राजेंद्र चव्हाण (वय ३८) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी शेवाळवाडी भाजी मार्केटच्या समोर घडली. हडपसर पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी अमोल सज्जन कानगुडे (वय ३६) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आनंद रविंद्र दोडके (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षा चालक आनंद दोडके दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षा चालवत हडपसरवरुन लोणीकडे जात असताना त्याने शेवाळवाडी येथे भाजी विक्री करणाऱ्या सारिका चव्हाण यांना जोराची धडक दिली. यात सारिका या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या मेंदूला मार लागला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे फिर्यादेत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गांधले करीत आहेत.









