ग्राहकामुळे डिलिव्हरी बॉयने स्वतःचेच आयुष्य संपवले; सुसाईड नोटमुळे घटनेचा उलगडा, नेमकं काय घडले?

तामिळनाडूमध्ये एका डिलिव्हरी बॉयने आत्महत्या केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. डिलिव्हरी बॉयने टोकाचे पाऊल का उचलले, याचा सुसाईड नोटमुळे उलगडा झाला. चेन्नईतील कोलाथूरमध्ये एका ग्राहकामुळे डिलिव्हरी बॉयने स्वतःचे आयुष्य संपवले. डिलिव्हरी बॉय आणि ग्राहकामध्ये काय घडले होते, याबद्दल माहिती समोर आली आहे.

आत्महत्या केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव पवित्रन आहे. तो बी.कॉम पदवीचे शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असताना घर खर्चासाठी पवित्रन फूड डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. नेहमीप्रमाणे ११ सप्टेंबर रोजी तो कामावर गेला आणि त्यानंतर जे घडले, त्याचा शेवट पवित्रनच्या मृत्यूने झाला. माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी पवित्रन कामावर गेला. कोराट्टूरमधील एका ग्राहकाने ऑर्डर केली होती. पवित्रन ही ऑर्डर घेऊन गेला. पण, ग्राहकाचे घर त्याला सापडत नव्हते. ते शोधण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे त्याला पोहोचायला उशीर झाला. उशिरा ऑर्डर घेऊन पोहोचलेल्या पवित्रनसोबत ग्राहक महिला भांडली. तिने पवित्रनला सुनावले. इतकेच नाही, तर महिलेने अ‍ॅपवर पवित्रनची तक्रार केली.

ही घटना इथेच थांबली नाही. महिलेने झापल्याने आणि अ‍ॅपवर तक्रार केल्याने पवित्रन नाराज झाला. या सगळ्याचा राग आल्यानंतर पवित्रनने महिलेच्या घरावर दगड फेकला. त्यामुळे महिलेच्या खिडकीची काच फुटली. त्यामुळे चिडलेल्या महिलेने पवित्रनची थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. महिलेने तक्रार केल्यानंतर पवित्रनने टोकाचे पाऊल उचलले. या सगळ्या प्रकारानंतर बुधवारी (१८ सप्टेंबर) पवित्रनचा घरात लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच कोलाथूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांना पवित्रनने आत्महत्या केलेल्या खोलीत एक सुसाईड नोट मिळाली. पवित्रनने आत्महत्येच्या कारणाबद्दल लिहिले आहे की, “डिलिव्हरी देण्यासाठी गेल्यानंतर महिला मला भांडली, शिवीगाळ केली. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेलो. अशा महिला असेपर्यंत असे मृत्यू होत राहतील”, असे त्याने म्हटले आहे.