आंदेकरच्या हत्येसाठी दीड महिन्यांपूर्वीच रचला कट ; खुनासाठी ३ पिस्तुलांचा वापर, कुठल्या रस्त्याने पळून जायचं याचाही प्लॅन

पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंदेकर यांच्या हत्येसाठी दीड महिन्यांपूर्वीच कट रचला होता. त्याच्या हत्येसाठी आरोपींनी संपूर्ण तयारी करूनच हत्या केली.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, दीड महिन्यांपासून वनराज यांच्यावर हल्लेखोरांचे लक्ष होते. वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी ३ पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. वनराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते, जयंत कोमकर यांनी प्लॅन आखला होता.सोमनाथ गायकवाडने अनिकेत दुधभातेला या हल्ल्याची माहिती दिली होती. रविवारी दुपारी वनराज आंदेकर यांच्यावर हल्ल्याचा प्लॅन आखला गेला आणि रात्री आंदेकर यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली.

अनिकेत दुधभातेने इतर आरोपींची जुळवाजुळव केली. त्यानंतर त्यांना घेऊन तो नाना पेठेत आला. तेथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या तसेच कोयत्याने वार केले. आंदेकर यांच्यावर हल्ला केल्यानंतर कुठल्या रस्त्याने पळून जायचं याची देखील आरोपींनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. आरोपी दुचाकीवरून आले आणि दुचाकीवरूनच पळून गेले. या हत्या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.