हॉर्न वाजविण्यावरुन झालेल्या वादात जीवे मारण्याची धमकी, टोळक्यावर गुन्हा दाखल

मंगल कार्यालयाच्या दारात हॉर्न वाजविण्यावरुन झालेल्या वादात ५ ते ६ जणांनी तरुणावर गन रोखून तुला येथेच संपवून टाकतो, अशी धमकी देऊन चॉपरने हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे.

अजय जितेंद्र बाटुंगे यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाचा मेंहदीचा कार्यक्रम टिंगरेनगरमधील तिरुपती मंगल कार्यालयात होता. तो कार्यक्रम संपल्यानंतर पाहुणे घरी जात असताना कार्यालयाच्या गेटवर हॉर्न वाजविण्याच्या कारणावरुन फिर्यादीचे नातेवाईक व सियाज चारचाकी कारचा चालक यांच्यात किरकोळ भांडणे झाले. त्यानंतर फिर्यादी हे घरी जात असताना ५ ते ६ जणांनी फिर्यादींचा पाठलाग केला.

फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यातील एकाने हातातील गन फिर्यादींवर रोखून तुला माहित आहे काय आम्ही कोण आहोत, असे बोलून फिर्यादी यांना शिवी देऊन तुला येथेच संपवून टाकतो, अशी धमकी दिली. दुसर्‍याने त्याच्या हातातील चॉपरने फिर्यादी यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याच्या हाताला जोरात झटका दिल्याने हातातील चॉपर निसटून दुसरीकडे पडला. फिर्यादीने पळून जाऊन स्वत:चा जीव वाचविला. सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख  तपास करीत आहेत.

यावेळी दुसर्‍या एका गटातील ८ ते १० जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत रोहित संजय परदेशी यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या घटनेत फिर्यादीचा भाऊ भावेश परदेशी हे जखमी झाले आहेत. फिर्यादी हे कामावरुन सियाज कारने घरी येत होते. यावेळी तिरुपती मंगल कार्यालय येथे आले असताना मंगल कार्यालयात आलेल्या लोकांमधील स्विफ्ट कारवरील चालकाने हॉर्न वाजवून गाडी बाजुस घेण्यास सांगण्याच्या कारणावरुन त्याने व त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी लोखंडी वस्तूने भावेश याच्या डोक्यात मारुन जखमी केले व त्यानंतर दोघांना हाताच्या चापटीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करुन घेतल्या असून पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर तपास करीत आहेत.