
राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून निवड करतो असे अमिष दाखवून व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू म्हणून खेळाडूचे प्रमाणपत्र देतो असा विश्वास संपादन करुन एका तरुणाची साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी दोघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पवन ज्ञानोबा म्हस्के यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन अरुण अनंतकवळस व त्याचा भाऊ अनंत अरुण अनंतकवळस यांच्यावर आयपीसी ४२०,४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन २०१९ ते ८ जुलै २०२४ या कालावधीत कुर्डुवाडी नगरपरिषद येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पवन म्हस्के व त्यांचा मित्र या दोघांची आरोपींसोबत कुर्डुवाडी नगरपरिषदेत ओळख झाली. त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून निवड करतो सांगितले. तसेच खेळाडू म्हणून एखाद्या खेळात खेळवून प्रमाणपत्र देतो असे सांगून विश्वास संपादन केला. या कामासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपींनी त्यांच्या दोन बँक खात्यावर असलेले साडेसात लाख रुपये आरटीएसद्वारे घेतले. त्यानंतर त्यांना राखीव खेळाडू म्हणून निवड न करता व न खेळवता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस आलेकर करीत आहेत.









