मावळ विधानसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण शेळके यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ११ नंतरही प्रचार रॅली सुरू ठेवत फटाके फोडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
मावळात यंदा विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांकडून लोकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रचारही सुरू आहे. मात्र सुनील शेळके यांच्याकडून काल रात्री उशिरापर्यंत प्रचाररॅली काढण्यात आली होती तेव्हा त्यामध्ये फटाके फोडण्यात आले. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शेळके यांच्यासह नामदेव दाभाडे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मावळमध्ये एकूण १८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत सहा अर्ज बाद झाले होते. तर अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सहा जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मावळच्या रिंगणात फक्त सहाच उमेदवार राहिले आहेत. मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे मोठे आव्हान होते. बापू भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी जाहीर केलेत्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.