
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट हा हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये शिजला, अशी धक्कादायक माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली आहे. हे तिन्ही आरोपी हरियानाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र होते. तिघेही २ सप्टेंबरला मुंबईत आले होते.

आरोपींकडून २८ जिवंत काडतूसं, दोन मोबाईल जप्त केले आहेत. यातील एक मोबाइल हा फक्त कॉलिंगसाठी होता. तर दुसरा नियमीत वापरासाठी असल्याची माहिती तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक तपासात तिघांवरही गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. ४ जणांनी मिळून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. हरियाणा आणि युपीतून आलेल्या ३ शुटर्सने सिद्दीकींवर गोळीबार केला. गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी तीन शूटर्सची नावे आहेत. गुरमैल सिंह हा हरियाणाचा, तर धर्मराज आणि शिवकुमार हे युपीतील बहराइच गंडारा गावचे रहिवासी आहेत. तीनही आरोपींना हँडल करणारा चौथा आरोपीसुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे.मोहम्मद झिशान अख्तर असे चौथ्या आरोपीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते. पंजाबच्या एका जेलमध्ये गुरमैल, धर्मराज आणि शिवकुमारची ओळख झाली. जेलमध्ये तिघेही बिश्नोई गँगच्या संपर्कात आले आणि तिथेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला गेला.

बाबा सिद्दिकींचे चिरंजीव आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या खेरवाडी सिग्नलजवळ असलेल्या कार्यालयाकडे जात असताना बाबा सिद्दिकींवर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण ५ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यातली एक गोळी त्यांच्या छातीजवळ लागली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी त्याठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. बाबा सिद्दिकी यांना १०- १५ दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती.









