ऑनलाइन फसवणुकीचे मोठे प्रकरण उघडकीस ! ३०,००० लोकांची ५०० कोटी रुपयांची फसवणूक; फसवणुकीत हाय प्रोफाइल यूट्यूबर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचाही सहभाग

 देशात ऑनलाइन फसवणुकीचे आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. एका ३० वर्षीय व्यक्तीने सुमारे ३०,००० लोकांची ५०० कोटी रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे, या घोटाळ्यात अनेक हाय प्रोफाइल यूट्यूबर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल IFSO (इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) ने चेन्नईचा रहिवासी मास्टरमाइंड शिवरामला अटक केली आहे.

आरोपी शिवरामने नोव्हेंबर २०१६ मध्ये सवरुल्ला एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये HIBOX नावाचे ॲपही लॉन्च केले. HIBOX ॲपचा गुंतवणूक योजना म्हणून प्रचार करण्यात आला होता. यामध्ये दररोज १ ते ५ टक्के, म्हणजेच महिन्यात ३० ते ९० टक्क्यापर्यंत व्याज देण्याचे आमिष दाखवण्यात आले. झटपट नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी हजारो लोकांनी या ॲपमध्ये गुंतवणूक केली. सुरुवातीला ॲपने परतावा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा ॲपवरील विश्वास वाढला. परंतु जुलै २०२४ पासून तांत्रिक त्रुटी आणि कायदेशीर वैधतेचे कारण देत पेमेंट थांबवले.

या घोटाळ्यात यूट्यूबर एल्विश यादव, लक्ष्य चौधरी, अभिषेक मल्हान, कॉमेडियन भारती सिंग आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. या सर्वांनी HIBOX ॲपची जाहिरात केली होती. पोलिसांनी या सर्वांना ३ ऑक्टोबर रोजी नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिस उपायुक्त (IFSO स्पेशल सेल) हेमंत तिवारी यांनी सांगितले की, हायबॉक्स ॲप नियोजित घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होते. IFSO युनिटने शिवरामच्या चार बँक खात्यांमधील १८ कोटी रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीसही पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणात, Easebuzz आणि Phonepe सारख्या पेमेंट गेटवे कंपन्यांच्या भूमिकेचाही पोलीस तपास करत आहेत. या कंपन्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.