नाशिक प्रतिनिधी – पाच अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून नाशिक गुन्हे शाखा एकच्या पथकाने 7 चॉपर, 1 कोयता आणि 1 गुप्ती असे घातक शस्त्र ताब्यात घेतली आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या मुलांच्या शाळेतील एक दहावीचा विद्यार्थी भूगोलचा शेवटचा पेपर आवरून एका मुलाला मारहाण करायला येणार होता आणि तो येताच त्याच्यावर हल्ला चढवण्याच्या तयारीत ही सर्व मुलं होती. गुन्हे शाखेच्या पथकाला वेळीच ही माहिती मिळताच त्यांनी चिंचबन परिसरात सापळा रचला होता.
ही पाचही मुलं नाशिकच्या दोन नामांकित शाळेतली आहेत. 15 ते 17 वयोगटातील ही मुले असून नववी आणि दहावीच्या इयत्तेत ते शिक्षण घेतात. ही शस्त्रे त्यांनी गुजरातच्या बडोद्याहून मागवली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या वादामागे प्रेम प्रकरणाची किनार असल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग ही सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असून या प्रकरणामुळे तर पोलीसही चक्रावून गेले आहेत.
याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले की, गुन्हे शाखा युनिट एकचे विलास चारोस्कर, नितीन जगताप आणि मुक्तार शेख यांना माहिती मिळाली होती की, चिंचबन, मखमलाबाद नाका, क्रांतीनगर आणि घारपुरे घाट या ठिकाणी काही मुले शस्त्र घेऊन उभी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली. याप्रकरणी पाच अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या दप्तरातून धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्र बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आमची पालकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. अन्यथा आता पालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये मागील काही काळापासून गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत चालला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुलांचे समुपदेशन करायलादेखील सुरुवात केली आहे. मात्र अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी आता थेट पालकांवरच कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.